७३ दिवसांच्या संघर्षानंतर ओबीसी कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने तोडगा
पालघर: ओबीसी कंत्राटी शिक्षकांचे ७३ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या वाडा येथील निवासस्थानासमोर गेल्या ६ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनद्वारे आंदोलकांशी संवाद साधून मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की, पुढच्या आठवड्यात त्यांची स्वतंत्र बैठक लावली जाईल आणि या प्रश्नातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ दिला जाईल. उपोषण मागे घेऊन कार्यालयाकडून बैठकीची तारीख घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणामुळे सगळे बाधित झाले असून पात्र असूनही संधी मिळत नसल्याची आंदोलकांची तक्रार मुख्यमंत्र्यांनी मान्य करत अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले की, त्यांनी आदल्या रात्री मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली होती आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलकांचा थेट संवाद घडवून आणला. उपोषणाच्या शेवटच्या ३ दिवसांत उपोषणकर्त्यांना वैद्यकीय अडचणी आणि रक्तदाबातील चढ-उतार जाणवत होते, त्यामुळे तोडगा काढणे तातडीचे झाले होते. येत्या आठवड्यातील बैठकीतून सकारात्मक निर्णय निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून शिक्षकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
व्हिडिओ सौजन्य: जनतेचा वाली
