माल्यान येथे निवासी भागातील दुकानाला आग; अदानीच्या अग्निशमन दलाची तत्पर धाव

Share:

पहाटे ५ वाजता मिळाली आगीची माहिती; अवघ्या नऊ मिनिटांत पथक घटनास्थळी दाखल, शेजारील घरांचे संभाव्य नुकसान टळले

दहाणू : दहाणू तालुक्यातील माल्यान, अदानी दहाणू थर्मल पॉवर स्टेशन (ADTPS) रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या निवासी परिसरात शनिवारी पहाटे फळविक्रीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अदानी दहाणू थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

दहाणू नगर परिषद अग्निशमन केंद्राकडून पहाटे ५ वाजता आगीची माहिती ADTPS अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन वाहन आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह पथक रवाना झाले. अवघ्या नऊ मिनिटांत, म्हणजेच सकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पाहणी केली असता निवासी परिसरातील एका फळविक्रीच्या दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने आग विझविण्याची मोहीम हाती घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर परिसरात कूलिंग ऑपरेशनही राबविण्यात आले. त्यामुळे आगीची झळ आसपासच्या घरांना आणि अन्य मालमत्तांना बसण्याचा धोका टळला.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन मोहीम पूर्ण करून पथक अग्निशमन केंद्रात परतले. ही संपूर्ण मोहीम अग्निशमन अधिकारी डी. एस. परमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना अग्निशमन कर्मचारी योगेश तारे, राजेश मार्डे, सुरक्षा रक्षक जयेश मच्छी आणि वाहनचालक सुरू मच्छी यांनी सहकार्य केले.

दरम्यान, अदानी दहाणू थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्य व्यवसाय अधिकारी दीपक पाटील यांनी अग्निशमन दलाच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अग्निशमन दलाने दाखविलेली तत्परता आणि व्यावसायिकता महत्त्वपूर्ण ठरल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबतचा तपास सुरू आहे. निवासी भागात घडलेल्या या घटनेत अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठे नुकसान टळल्याचे चित्र आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *