दलाल, भांडवलदार आणि सरकारसमोर झुकणार नाही; जल, जमीन, जंगल आणि समुद्राच्या हक्कांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार – आमदार कॉम्रेड विनोद निकोले
वरोर : “आमदारकी आज आहे, उद्या नसेल; पण जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. पैसा, प्रॉपर्टी यापेक्षा जीवाला जीव देणारे कार्यकर्ते मिळवले, हेच माझे सर्वांत मोठे वैभव आहे. दलाल, भांडवलदार आणि सरकारसुद्धा मला विकत घेऊ शकत नाही!” अशा आक्रमक आणि रोखठोक शब्दांत आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी वाढवण बंदरविरोधी आंदोलन आणि मच्छीमार दिनानिमित्त वरोर येथे आयोजित सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. जल, जमीन, जंगल आणि समुद्राच्या हक्कांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निवडणुकीच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागात पाचशे रुपयांची नोट देऊन मतदारांना प्रभावित केले जाते. मात्र मतदारांनी उमेदवाराचे काम, विचार आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी तपासण्याऐवजी पैशाला महत्त्व दिले, तर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी विनाशकारी प्रकल्पांविरोधात सरकारदरबारी, विधानसभा आणि लोकसभेत जनतेचा आवाज प्रभावीपणे उठवतील का, असा सवाल निकोले यांनी उपस्थित केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, पैसे वाटणाऱ्या प्रवृत्तींना थारा देऊ नका, पैसे घेऊन मतदान करू नका, तर आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या चांगल्या उमेदवारांना मतदान करा. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व विधानसभा आणि लोकसभेत पोहोचणे आवश्यक आहे.
आपल्या राजकीय प्रवासातील खरी कमाई सांगताना निकोले यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. पैसा, प्रॉपर्टी आणि संपत्तीपेक्षा संघर्षाच्या काळात खांद्याला खांदा लावून उभे राहणारी माणसे कमावणे अधिक महत्त्वाचे आहे. जनतेने कोणताही आर्थिक मोबदला न घेता आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेशी असलेली नाळ कधीही तुटणार नाही. माझा संघर्ष पदासाठी किंवा आमदारकी टिकवण्यासाठी नसून सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वासाठी आहे. दलाल, भांडवलदार किंवा सरकार कोणतीही ताकद वापरो, आमचा आवाज दाबता येणार नाही आणि मला विकत घेता येणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी सभेतून दिला.
पालघर जिल्हा निसर्गसंपन्न असून जैवविविधता, जंगलसंपत्ती आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा वारसा लाभलेला आहे. मात्र विकासाच्या नावाखाली विविध मोठ्या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या जल, जमीन, जंगल आणि समुद्रावरील पारंपरिक हक्कांवर संकट निर्माण होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. काही धनदांडगे भांडवलदार आणि स्थानिक पातळीवरील प्रकल्पसमर्थक वैयक्तिक स्वार्थासाठी अशा प्रकल्पांना मदत करत असल्याची टीका करत स्थानिकांच्या हितापेक्षा स्वतःच्या फायद्याला प्राधान्य देणाऱ्या प्रवृत्तींना जनतेने जाब विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. या संघर्षात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मच्छीमार, आदिवासी बांधव, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विशेषतः महिलांचा आणि तरुणाईचा वाढता सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना लाल सलाम केला.
वाढवण बंदरविरोधी संघर्षादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बोईसर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर महिलांची सुटका करण्यात आली; मात्र इतर कार्यकर्त्यांच्या सुटकेचा प्रश्न निर्माण झाल्याने महिलांनी पोलीस ठाण्यात ठाम भूमिका घेतली. कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे, या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. घटनेची माहिती मिळताच आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी बोईसर पोलीस ठाण्यात धाव घेत कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी ठिय्या आंदोलन केले. संकटाच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांची विचारपूस करणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी नेतृत्वाची ओळख असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
जिल्ह्यात सात आमदार आणि दोन खासदार असतानाही वाढवण बंदरविरोधी संघर्षात सर्वसामान्य जनतेच्या बाजूने प्रत्यक्ष कोण उभे राहते, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला. या संघर्षात आमदार विनोद निकोले सातत्याने आंदोलक आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याची भावना सभेत व्यक्त करण्यात आली. क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जमीन आणि जंगलाच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत, असे सांगत निकोले यांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी विरोधक, भांडवलदार, दलाल किंवा सरकारच्या माध्यमातून विविध आरोप आणि अफवा पसरवल्या जाऊ शकतात; मात्र नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून स्थानिकांचे अस्तित्व, पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील पारंपरिक हक्क वाचविण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तम पिंपळे, कष्टकरी संघटनेचे लोबो, मधुताई, भरत वायडा, प्रशांत पाटील, मिलिंद पाटील, चंद्रकांत गोरखाना यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून वाढवण बंदरविरोधी आंदोलनात विविध पक्ष, संघटना, मच्छीमार, आदिवासी बांधव, महिला आणि तरुण सहभागी होत असून या संघर्षाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानिकांच्या हक्कांचा, पर्यावरणाच्या संरक्षणाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे.
“जल, जमीन, जंगल आणि समुद्र आमच्या हक्काचा; आमचा आवाज विकत घेता येणार नाही!” या निर्धाराने सभेचा सूर अधिक आक्रमक झाला. सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या संघर्षाला प्राधान्य देण्याची भूमिका मांडत आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर सोबत राहण्याची ग्वाही दिली.
जनतेचा वाली | संपादक : विजय घरत
