शिवसेना संघटनवाढीसाठी मतभेद विसरून एकजुटीने काम करा; शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

Share:

पालघर जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा; अडचणीत असलेल्या एकाही शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहील – आमदार विलास तरे यांचा निर्धार

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा जिल्हा आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व ठामपणे उभे असून, अडचणीत असलेल्या एकाही शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे संपर्कमंत्री योगेश कदम यांनी दिली. पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी आणि हेवेदावे बाजूला ठेवून संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने डहाणू व तलासरी येथे शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसैनिकांशी थेट संवाद साधताना पक्षसंघटन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवसैनिकांच्या पाठीशी वरिष्ठ नेतृत्व खंबीरपणे उभे

यावेळी मार्गदर्शन करताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पालघर जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून येथील प्रत्येक शिवसैनिकाच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. कोणत्याही शिवसैनिकाने स्वतःला एकटे समजू नये. पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालपणापासून प्रभाव असल्याचे सांगताना कदम म्हणाले की, शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणारी संघटना आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हे पक्षाचे कर्तव्य आहे.

२४ तास, ३६५ दिवस शिवसैनिकांसाठी उपलब्ध

शिवसैनिकांशी संवाद साधताना योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. माझा एकच मोबाईल क्रमांक असून, दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस मी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क साधावा. त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालघर जिल्ह्यात जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामे आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कायदा सर्वांसाठी समान असून कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचनाही देण्यात येतील, असे कदम यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहील

यावेळी आमदार विलास तरे यांनी पालघर जिल्ह्यात शिवसेना संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. पालघर जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा जिल्हा असून, येथील शिवसैनिकांनी आजवर निष्ठेने आणि संघर्षातून पक्षसंघटना उभी केली आहे.

आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष राहील, असा विश्वास आमदार तरे यांनी व्यक्त केला.

गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, प्रत्येक गावातील नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे आणि त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसैनिकांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता वर्षभर जनतेच्या सेवेत कार्यरत राहावे. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसैनिकांना संघटनात्मक तयारीला लागण्याचे आवाहन केले. पालघर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

पक्षांतर्गत मतभेद आणि हेवेदावे बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनुसार जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शिवसेनेचे विचार प्रत्येक गावात आणि घराघरांत पोहोचविताना नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्यांच्या समस्या संबंधित प्रशासनापर्यंत मांडणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हीच शिवसैनिकांची खरी जबाबदारी असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

या मेळाव्यास गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, शिवसेना संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, प्रवक्ते केदार काळे, डॉ. उज्वला काळे, युवासेनेचे चेतन धर्ममेहेर, सौरभ आप्पा, उपजिल्हाप्रमुख नीलम संखे, सुशील चुरी, पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरात, संजय चौधरी, वैदेही वाढाण यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात पक्षसंघटन अधिक सक्षम करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद राखणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करण्यावर भर देण्यात आला.

“पदापेक्षा संघटना मोठी आणि संघटनेपेक्षा जनतेचे हित सर्वोच्च मानून प्रत्येक शिवसैनिकाने काम करावे. शिवसैनिकांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू,” असा विश्वास गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *