भूसंपादन आणि मोबदल्यासंदर्भातील प्रश्नांसाठी प्रशासनाचे एकाच छताखाली सहाय्य; १०० हून अधिक जमीनधारकांची उपस्थिती
पालघर | २ नोव्हेंबर २०२६
वाढवण बंदर प्रकल्पाशी संबंधित जमीनधारकांच्या भूसंपादन आणि मोबदल्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या शिबिराला १०० हून अधिक जमीनधारकांनी उपस्थिती लावली. अभिलेखांमधील अनेक त्रुटींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर पुढील पडताळणी आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांना कार्यवाहीची माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात संबंधित प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येणाऱ्या जमीनधारकांना सर्व संबंधित अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली.
जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र आढावा घेत जमीनधारकांना मार्गदर्शन केले. अपूर्ण कागदपत्रे, महसूल अभिलेखांमधील तफावत, प्रलंबित वारस नोंदी तसेच जमिनीतील वैयक्तिक हिश्श्यांबाबतच्या समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अनेक प्रकरणांतील त्रुटींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. मात्र, काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त पडताळणी आणि प्रक्रियात्मक पूर्तता आवश्यक असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जांची तपासणी करून पुढील कार्यवाहीची माहिती दिली. त्यामुळे जमीनधारकांना आपल्या प्रकरणाची सद्यःस्थिती जाणून घेता आली.
वादग्रस्त प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार मोबदला
मालकी हक्क, वारसा हक्क किंवा मोबदल्याच्या वाटपावरून वाद असलेल्या तसेच न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या जमीनधारकांना कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केवळ वाद असल्यामुळे मोबदल्याचा दावा करण्याचा हक्क संपुष्टात येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकरणांमध्ये पात्रता, जमिनीतील हिस्सा आणि मोबदल्याचे वितरण हे कायदेशीर प्रक्रिया तसेच सक्षम प्राधिकरण किंवा न्यायालयाच्या निर्णयानुसार निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्यस्थांपासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
मोबदला लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या मध्यस्थांवर किंवा अनधिकृत व्यक्तींवर जमीनधारकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले. भूसंपादन आणि मोबदल्यासंदर्भातील अधिकृत माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचेही नागरिकांना सांगण्यात आले.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या जनसंपर्क उपक्रमांना पुढे नेणारे हे विशेष शिबिर नागरिकांना सुलभ मार्गदर्शन, वैयक्तिक सहाय्य आणि पारदर्शक संवाद उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांचा भाग आहे. वाढवण बंदर प्रकल्पाशी संबंधित पात्र जमीनधारकांना सन्मानपूर्वक सहकार्य करून मोबदला आणि अन्य अनुज्ञेय लाभांची प्रक्रिया कायद्यानुसार, पारदर्शकतेने आणि शक्य तितक्या तत्परतेने पूर्ण करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
