खासदार क्रीडा महोत्सवातील वादावर शिवसेना प्रवक्ते केदार काळे यांची संयमी भूमिका; वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त बैठकीची मागणी
पालघर : खासदार क्रीडा महोत्सव २०२६ च्या समारोप कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा पालघर लोकसभा जिल्हा सहसंपर्कप्रमुख केदार काळे यांनी संयमी भूमिका मांडत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी परस्परांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे.
खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या पुढाकाराने आयोजित या क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. यावेळी घडलेल्या कथित शाब्दिक वादावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळाली. हिंदुत्वाचा विचार आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी भाजपसोबत महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे या राजकीय भागीदारीत प्रत्येक घटक पक्षाने एकमेकांच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे.
महायुती ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून परस्पर विश्वास, सहकार्य आणि समन्वयावर आधारित भागीदारी आहे. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना सहकार्य केले. तर विधानसभा निवडणुकीत पालघर आणि बोईसर येथे शिवसेनेचे उमेदवार असताना भाजप व मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली. तसेच वसई, विरार, नालासोपारा, विक्रमगड आणि डहाणू या मतदारसंघांत शिवसेना व मित्रपक्षांनी भाजपच्या उमेदवारांना सहकार्य केल्याचे काळे यांनी नमूद केले.
सार्वजनिक कार्यक्रमात मतभेद निर्माण झाले तरी ते चर्चेतून आणि समन्वयातून सोडवणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अथवा गैरसमज निर्माण होऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ नेतृत्वाने संयुक्त बैठक घ्यावी
महायुतीतील वरिष्ठ नेतृत्वाने पुढाकार घेऊन शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत परस्परांमधील गैरसमज दूर करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी समन्वयाची ठोस व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केदार काळे यांनी केली.
आमची भूमिका कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून महायुतीची एकजूट, परस्पर सन्मान आणि विकासासाठीचे सहकार्य टिकवण्याची आहे. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र मनभेद निर्माण होऊ नयेत. महायुती मजबूत राहिली तरच कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
— केदार काळे
प्रवक्ते, शिवसेना महाराष्ट्र तथा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना पालघर लोकसभा
