तारापूर एमआयडीसीत गिनी सिल्क मिलला भीषण आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण, अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर!

Share:

प्लास्टिकचे शेड, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा विळखा; अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग मोकळा मिळणार कधी? एमआयडीसी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बोईसर, प्रतिनिधी : तारापूर औद्योगिक वसाहतीतील गिनी सिल्क मिल या नामांकित कापड कारखान्याला रविवारी (१ नोव्हेंबर) सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्याच्या स्टोअर रूम आणि संगणक विभागातून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने रविवार असल्याने कंपनी बंद होती आणि कामगार उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने तारापूर एमआयडीसीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेबरोबरच कंपनी परिसरातील अतिक्रमणांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

तारापूर एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक ई-१५ येथे असलेल्या गिनी सिल्क मिलच्या स्टोअर रूम आणि संगणक विभागातून रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास धूर बाहेर पडू लागला. घटनेची माहिती मिळताच सकाळी ७.४० वाजता तारापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

पालघर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक माधव तोटेवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या स्टोअर रूममधील संगणक विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आगीमुळे साहित्याचे नुकसान झाले असून, नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील निश्चित करण्यासाठी पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अतिक्रमणांचा विळखा; अग्निशमन दलासमोर नवे संकट!

गिनी सिल्क मिलच्या आगीच्या घटनेनंतर तारापूर एमआयडीसीमधील आणखी एक गंभीर बाब चर्चेत आली आहे. औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांच्या सभोवताली प्लास्टिकचे शेड, अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी आहेत. या अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.

औद्योगिक विकासाच्या नावाखाली कंपन्यांच्या परिसरात नियमबाह्य बांधकामे आणि अतिक्रमणे होत असतील, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी आवश्यक असलेले मार्ग मोकळे ठेवण्याचे नियम प्रत्यक्षात पाळले जातात का? प्लास्टिकचे शेड आणि अनधिकृत बांधकामांना परवानगी कुणी दिली? एमआयडीसी प्रशासनाने यापूर्वी अशा अतिक्रमणांची पाहणी केली आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

केवळ आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. तर अशा दुर्घटना घडू नयेत आणि दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी आधीपासून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जनतेचा वालीचा सवाल

तारापूर एमआयडीसी प्रशासनाने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्लास्टिकचे शेड, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करणार का? अग्निशमन दलाच्या वाहनांसाठीचे मार्ग अतिक्रमणमुक्त करणार का? की एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार?

कारखाने वाचवायचे की अतिक्रमणांना अभय द्यायचे? औद्योगिक विकास महत्त्वाचा आहेच; पण कामगारांचे जीव त्याहून अधिक महत्त्वाचे नाहीत का?

— जनतेचा वाली

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *