
महिला संघाची कर्णधार
पालघर : पालघर जिल्ह्यातील चिंचणी (पाटीलवाडा) येथील कु. शर्वी वैशाली सुहास सावे हिची २३ वर्षांखालील मुंबई महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत मुंबईच्या युवा क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाल्याने चिंचणीसह पालघर जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.
शर्वीने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रुची निर्माण करून सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या खेळाची छाप उमटवली. मुंबईच्या युवा क्रिकेट संघांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शर्वीला क्रीडा क्षेत्राचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. तिची आई वैशाली सावे या पालघर जिल्ह्यातील कबड्डीपटू असून सध्या कबड्डी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिचे वडील सुहास सावे हे क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे खेळातील शिस्त, मेहनत आणि सातत्याचे संस्कार शर्वीला घरातूनच मिळाले.
शालेय जीवनापासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असताना शर्वीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. प्रतिकूल परिस्थितीतही सराव आणि मेहनत सुरू ठेवत तिने मुंबईच्या युवा क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. तिच्या या प्रवासात आई-वडिलांसह प्रशिक्षक, सहकारी आणि मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
ग्रामीण भागातील मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता आणि क्षमता असून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास त्या मोठ्या व्यासपीठावर यश मिळवू शकतात, हे शर्वीच्या निवडीने अधोरेखित झाले आहे. चिंचणीच्या मातीतून सुरू झालेला तिचा क्रिकेट प्रवास आता मुंबईच्या संघाचे नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचला आहे.
शर्वीच्या निवडीबद्दल सावे परिवार, चिंचणी ग्रामस्थ आणि पालघर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.