
एंबूर-ऐरंबी आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प अभियान’
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, एंबूर-ऐरंबी येथे सोमवार, २१ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक योगेश खंदारे यांनी आदिवासी समाजातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच चित्रफितीच्या माध्यमातून योजनांची माहिती व लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच सुदर्शन वनगा आणि ग्रामसेवक भागवत कांबळे यांनी ग्रामस्थांना आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार विलास तरे यांनी विद्यार्थी व पालकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक सोयी-सुविधांचा योग्य उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सरपंच सुदर्शन वनगा, अधीक्षक योगेश खंदारे, आदिवासी विकास निरीक्षक यदुनाथ भोये, रोहित पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक गवई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोंटलेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विष्णू खोडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
