
भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू
वाडा : विक्रमगड रोडवरील टीना रबर कंपनीत स्टोअर रूमची भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारास घडली. सकाळी दहाच्या सुमारास हे कामगार नाश्ता करीत असताना अचानक भिंत कोसळल्याने त्यांच्यावर मलबा कोसळला.
या दुर्घटनेत केशव वालकु गुनगुणा (५५, रा. मोहा, ता. विक्रमगड), मीरा जानू गवळी (६०, रा. वसूरी, ता. विक्रमगड) आणि रंजना दिलीप कोंब (३५, रा. कोंब-पोशेरी, ता. वाडा) यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कामगार नाश्ता करण्यासाठी स्टोअर रूमच्या भिंतीलगत बसले होते, ही बाबही चर्चेत आली आहे. कंपनीमध्ये कामगारांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित भोजनकक्ष अथवा नाश्ता करण्याची व्यवस्था होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच स्टोअर रूमच्या भिंतीची अवस्था धोकादायक होती का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची तपासणी कामगार विभागाने करावी, अशी मागणी होत आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.