
पालघरमध्ये दोन युवा गटांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वाणगाव येथे पक्षप्रवेश; युवकांचा वाढता संपर्क काँग्रेसचे दिवस येणार
पालघर : वाणगाव येथील काँग्रेस कार्यालयात बुधवारी (२३ सप्टेंबर) दोन युवा गटांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील युवकांचा काँग्रेसशी संपर्क वाढत असून सलग पक्षप्रवेश होत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील युवा टेनिस-बॉल क्रिकेटपटू भारत चिखलीकर, लेदर-बॉल क्रिकेटपटू कौशिक व तन्विश वाझे, तसेच चिंचणी येथील जयेश रावरे आणि विनायक तामोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोर्गरबाव, दांडी-पालघर आणि नवरपूर-बोईसर परिसरातील युवा समर्थकांचाही यामध्ये सहभाग होता.
राहुल गांधी यांचे विचार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा संघर्षाचा दृष्टिकोन आणि कॅप्टन सत्यम ठाकूर यांची कार्यपद्धती व जनतेशी असलेला संवाद यामुळे प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे या युवकांनी सांगितले. भारत चिखलीकर यांनी, समाजसेवा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्यासाठी काँग्रेस हे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, गंजाड परिसरातील युवकांनीही युवा कार्यकर्ते अविनाश वांगड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वांगड यांनी कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे मिळाल्याचे सांगितले. तसेच, गावातील एका प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठाकूर यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला. गंजाड येथे युवकांची बैठक घेऊन आगामी काळात मोठ्या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेश करणाऱ्या युवकांचे स्वागत करताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी युवकांचा सहभाग संघटनेसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही संघभावना महत्त्वाची असून, नव्या कार्यकर्त्यांसह संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते नामदेव पाटील, डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वायडा, तालुका कार्याध्यक्ष विकास माडवे, ओबीसी सेल अध्यक्ष स्वप्नील पाटील, वाणगाव ग्रामपंचायत सदस्य अक्षय ढोडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
महागाईसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर भविष्यात काँग्रेसचे नेतृत्व हा पर्याय ठरेल, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला.