
पालघर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात ३६७ सार्वजनिक आणि ८६९ खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पालघर पोलीस दलाकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७३ पोलीस अधिकारी, ५८४ पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड, ६० वाहतूक अंमलदार, आठ स्ट्रायकींग फोर्स, तीन दंगल नियंत्रण पथके तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, मिरवणूक मार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर पीए सिस्टीम आणि माईकची व्यवस्था करण्यात आली असून, विसर्जन मार्गावर बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची नजर
गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना १३ नॉईज लेव्हल मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून मिरवणुकांदरम्यान ध्वनीची पातळी तपासली जाणार असून, निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी प्रदूषण आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
विसर्जन घाटांवर सुरक्षा व्यवस्था
विसर्जन घाटांवर नगरपरिषदांचे जीवरक्षक तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोहणारे स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. घाटांवर दोरखंड, लाइफ जॅकेट आणि प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावर पिण्याचे पाणी, सेवाभावी संस्थांकडून अल्पोपहार, तसेच प्रकाशासाठी दिवे आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपरिषदांकडून स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘उत्सव प्रहरी’मधून उत्कृष्ट मिरवणुकांना पुरस्कार
विसर्जन मिरवणुका अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सामाजिक संदेश देणाऱ्या व्हाव्यात, यासाठी पालघर पोलिसांकडून ‘उत्सव प्रहरी – विसर्जन मिरवणूक स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर तीन उत्कृष्ट आणि दोन उत्तेजनार्थ अशी पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी प्रत्येकी एक अशा सात तालुकास्तरीय बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण १२ बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत.
याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करून यावर्षी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणूक पुरस्कार देण्यात येणार आहेत. पालघर पोलिसांनी गणेश मंडळे आणि नागरिकांनी ध्वनी प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.