डहाणू तहसील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

तहसील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
रेशनकार्ड काढून देण्यासाठी ४ हजारांची मागणी; डहाणू तहसील कार्यालयातील गोदाम लिपिकावर कारवाई
पालघर | जनतेचा वाली
नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या गोदाम लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सचिन बाळासो म्हरगर असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराने रेशनकार्ड काढून देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने प्रति रेशनकार्ड ५०० रुपये याप्रमाणे आठ रेशनकार्डसाठी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १८ ऑगस्ट रोजी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कारवाईचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार २ सप्टेंबर रोजी डहाणू तहसील कार्यालयात कायदेशीर सापळा रचण्यात आला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून ६ रेशनकार्डचे मोबदला म्हणून ३ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश लक्ष्मण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईच्या पथकात पर्यवेक्षक अधिकारी दत्ताराम सुभाष करांडे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश दळवी, जितेंद्र गवडे आणि आकाश लोहार यांचा सहभाग होता.
रेशनकार्डसारख्या नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित शासकीय सेवेसाठी लाच मागितल्याने या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांकडून कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *