जीव वाचवणारे देवदूत; अग्निशमन दलातील पंकज सातवींना ‘सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड’

वसई | जनतेचा वाली
वसईतील सनसिटी परिसरात विषारी क्लोरीन वायूची गळती झाल्याच्या गंभीर प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाव घेत शेकडो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील जवान पंकज रमेश सातवी यांच्या धाडसाचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक संतोष वारिक यांच्या हस्ते सातवी यांना ‘Safe India Bravery Award’ प्रदान करण्यात आला.
दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वसईतील सनसिटी स्मशानभूमीजवळील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या १०० किलो क्षमतेच्या क्लोरीन सिलिंडरमधून विषारी वायूची गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही पंकज सातवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गळती थांबविण्यासाठी धाडसी प्रयत्न केले.
गळका सिलिंडर सुरक्षितपणे परिसरातील नाल्यात हलविण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या वेळी दाखविलेल्या धैर्यामुळे सनसिटी परिसरातील सुमारे १५० ते २५० नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
कर्तव्य बजावताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पंकज सातवी यांच्या कार्याची दखल आता राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेला हा पुरस्कार केवळ एका अग्निशमन जवानाचा सन्मान नसून, संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या संपूर्ण अग्निशमन दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव मानला जात आहे.
आगीशी झुंज देणारेच नव्हे, तर विषारी वायूच्या धोक्यातही स्वतःला झोकून देत नागरिकांचे प्राण वाचविणारे हे खरे ‘जीव वाचवणारे देवदूत’ आहेत. पंकज सातवी यांच्या शौर्याची कहाणी समाजासाठी प्रेरणादायी असून, ‘कर्तव्य प्रथम’ या भावनेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
‘जनतेचा वाली’च्या वतीने पंकज रमेश सातवी यांचे या उल्लेखनीय शौर्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या धाडसाला आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम.