नागझरीत अमली पदार्थांविरोधात ग्रामपंचायतीचा पुढाकार; गुटखा विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई

नागझरी प्रतिनिधी जनतेचा वाली दिनांक 29/8/2026 तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी नागझरी ग्रामपंचायतीने आता ठोस पाऊल उचललं आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुदेश पाटील आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावात अमली पदार्थविरोधी जागर सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, नागझरी येथील एका पानटपरीवर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित पान विक्रेत्याला गुटखा विक्री करताना पकडल्याचे सांगण्यात येत आहे. हा गुटखा बोईसर येथून आणला जात असल्याची माहिती समोर आल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईपूर्वीच नागझरी-चरीखुर्द ग्रामपंचायतीने अमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अधिकृत भूमिका घेतली होती. 24 ऑगस्ट 2026 रोजी काढलेल्या नोटीसमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदार, पानटपरी, सुपरमार्केट, हॉटेल, किराणा दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांना पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, पान मसाला आणि गुटख्याची विक्री तसेच मादक पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला प्रत्यक्ष कारवाईची जोड मिळाल्याने नागझरीतील अमली पदार्थविरोधी मोहिमेला आता वेग आला आहे. पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेलाही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ प्रशासनानेच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. नागझरी ग्रामपंचायत, उपसरपंच सुदेश पाटील आणि ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार त्यामुळेच कौतुकाचा विषय ठरत आहे.
गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईसोबतच हा गुटखा नेमका कुठून येतो आणि त्यामागील पुरवठा साखळी कोणाची आहे, याचाही तपास होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.