
आदिवासी-बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणारे रामभाऊ वाडू काळाच्या पडद्याआड
भूमी सेनेचे ज्येष्ठ लढवय्ये कार्यकर्ते कै. रामभाऊ नवशा वाडू यांचे अल्पशा आजाराने निधन; कोंढाण येथे अंत्ययात्रा
पालघर :जनतेचा वाली आदिवासी, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे भूमी सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. रामभाऊ नवशा वाडू यांचे सोमवारी (दि. १७ ऑगस्ट २०२६) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आदिवासी-बहुजन समाजातील एका संघर्षशील आणि निस्वार्थी नेतृत्वाचा अस्त झाला आहे.
भूमी सेनेच्या स्थापनेपासून रामभाऊ वाडू यांनी आदिवासी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष व भूमी सेनेचे लढवय्ये नेते निसर्गवासी काळूराम धोदडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे आणि संघर्षांत सक्रिय सहभाग घेतला. सरकारी दरबारी सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना त्यांनी अनेक वर्षे आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले.
समाजवादी विचारसरणीचा वारसा घेऊन अनेक ज्येष्ठ मंडळी बरोबर रामभाऊ वाडू यांनी काम केले, समाजवादी नेते मधु दंडवते मुन्नानताई गोरे, हुसेन भाई दलवाई, नीलम गोरे ,असे अनेक नेते पालघर जिल्ह्यात येऊन इथल्या आदिवासी बहुजन समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास केला,
पालघर आणि मनोर परिसरात पूर्वी वाहतुकीची साधने अत्यल्प असताना मिळेल त्या वाहनाने, तर अनेकदा पायी प्रवास करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाच्या दारात धाव घेतली. प्रसिद्धी, माध्यमांचे व्यासपीठ किंवा डिजिटल युगातील प्रचार यापासून दूर राहून केवळ समाजसेवेच्या ध्येयाने काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांचे पुत्र मधुकर रामभाऊ वाडू आणि प्रकाश रामभाऊ वाडू यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती केली. मधुकर वाडू यांच्या चित्रकलेला जागतिक स्तरावर मिळालेली ओळख ही रामभाऊंच्या शिक्षणाविषयीच्या जिद्दीची आणि दूरदृष्टीची साक्ष मानली जाते.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या रामभाऊ वाडू यांनी शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भूमी सेना आणि आदिवासी समाजाने एक निष्ठावान, संघर्षशील आणि संवेदनशील सहकारी गमावला आहे.
कै. रामभाऊ नवशा वाडू यांची अंत्ययात्रा सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोंढाण (बुकलेपाडा) येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
जनतेचा वाली, संपादक विजय घरत ,कुणबी सेना ग्रुप परिवारातर्फे कै. रामभाऊ वाडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली!