


स्वातंत्र्याला ८० वर्षे; वाढीव गावाला अद्याप रस्ता नाही! विद्यार्थ्यांचा रेल्वे रुळांवरून जीवघेणा प्रवास
पालघर :जनतेचा वाली देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण होत आली, देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे चित्र उभे केले जात असताना पालघर तालुक्यातील वाढीव गावातील वास्तव मात्र या विकासाच्या दाव्यांना आरसा दाखवणारे आहे. मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन, विविध रेल्वे कॉरिडॉर यांसारखे मोठमोठे प्रकल्प वेगाने आकार घेत असताना सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या वाढीव गावाला आजही सुरक्षित जोडरस्ता आणि पूल उपलब्ध झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या वाढीव गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने रेल्वे मार्गालगतून, तर काही ठिकाणी थेट रेल्वे रुळांवरून प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोजचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी मोठा धोका निर्माण करणारा ठरत आहे.
विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत
या परिस्थितीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गावासाठी सुरक्षित रस्ता आणि पूल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, वाढीव गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात अडचणी अधिक गंभीर
पावसाळ्यात वाढीव गावातील परिस्थिती आणखी बिकट होते. खराब रस्ते, चिखल आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सुरक्षित मार्ग नसल्याने रेल्वे मार्गाचा आधार घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. त्यामुळे अपघाताची भीती कायम असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वेळ येऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
मोठमोठे प्रकल्प, मात्र गावासाठी साधा रस्ताही नाही
एकीकडे मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन आणि विविध रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारले जात आहे. मात्र याच पालघर जिल्ह्यातील वाढीव गावातील नागरिकांना सुरक्षित रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे विकासाच्या मोठमोठ्या घोषणांबरोबरच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने पाहतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘पाठपुरावा सुरू’ पण प्रत्यक्ष काम कधी?
वाढीव गावातील रस्ता आणि पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. पालघरचे खासदार तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्याकडूनही या प्रश्नावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र ग्रामस्थांचा मुख्य प्रश्न आहे तो प्रत्यक्ष कामाचा.
पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून वर्षे उलटली, मात्र रस्ता आणि पूल प्रत्यक्षात कधी उभा राहणार? विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार? असा सवाल आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दुर्घटनेपूर्वी उपाययोजना करण्याची मागणी
वाढीव गावातील विद्यार्थ्यांना रेल्वे रुळांवरून प्रवास करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभागांनी गावाची पाहणी करून सुरक्षित जोडरस्ता, आवश्यक पूल अथवा पर्यायी मार्गाची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देश स्वातंत्र्याची ८० वर्षे साजरी करीत असताना एका गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रेल्वे रुळांवरून जीव मुठीत घेऊन जावे लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. वाढीव गावातील विद्यार्थ्यांची ही हाक आता थेट राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का आणि वाढीव गावाला सुरक्षित रस्ता व पूल कधी मिळणार, हा प्रश्न आता पालघरच्या प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
