पालघर बसस्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर विकासाचा प्रस्ताव
आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे अनावरण


पालघर : पालघर आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवार, १० ऑगस्ट रोजी आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या बसगाड्यांचे अनावरण करण्यात आले. नवीन बसगाड्यांमुळे पालघर शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या वेळी पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत, रोहित गावित, नगरसेवक जस्विन घरत, विभागीय वाहतूक अधिकारी रोहिणी ठाकरे, अमीन तडवी, सोळंकी, कार्यशाळा अधीक्षक माणिक गायकवाड, राजू पाटील, संघटना विभागीय सचिव अर्शद चुनेवाला, नकुल पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीच्या धर्तीवर बसस्थानकाचा विकास
पालघर बसस्थानकाचा वाढता प्रवासी भार लक्षात घेऊन त्याचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याची गरज आहे. बारामतीच्या धर्तीवर पालघर बसस्थानक आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज करण्यात यावे, अशी आपली भूमिका असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिली.
प्रवाशांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, बस वाहतूक व्यवस्था आणि इतर सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करून बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गावित यांनी सांगितले.
दरम्यान, पालघर आगारात दाखल झालेल्या पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन बसगाड्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *