
विक्रमगड : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकार परिषद, पालघर जिल्ह्याच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी हरणोली-मलवाडा (ता. विक्रमगड) येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात एकदिवसीय ग्रामीण सेवा, शिक्षण व आरोग्य सुविधा पाहणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात विद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थिनींची गुणवत्ता, स्वच्छता, भोजन व्यवस्था, शिस्त तसेच निवासी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी घेत असलेल्या मेहनतीचे पत्रकारांनी कौतुक केले.
विक्रमगड तालुक्यात अत्यंत छोट्या जागेतून या बालिका विद्यालयाची सुरुवात झाली. आज त्याचे विस्तारलेले स्वरूप पाहता त्याने वटवृक्षाचे रूप धारण केल्याचे चित्र आहे. शिस्त, स्वच्छता, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा संगम विद्यालयात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, तुलनेने अल्प मानधनात कार्यरत असलेले शिक्षक केवळ नोकरी म्हणून नव्हे, तर विद्यादानाचे कार्य म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याचे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेतून दिसून आले.
संस्थेचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संदीप पावडे तसेच शिक्षक व विद्यार्थिनींनी पत्रकारांना विद्यालयाचा इतिहास आणि आजवरची वाटचाल सांगितली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या विद्यालयाला भेट देऊन मदत केली असून, त्यातून विद्यालयाच्या विकासाला हातभार लागल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या सुमारे २५० विद्यार्थिनी या विद्यालयात निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये काही अनाथ, तर अनेक विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील आहेत.
शिक्षणाबरोबरच कला-क्रीडेलाही प्राधान्य
अद्ययावत शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांबरोबरच संगीत, कला, क्रीडा आणि संस्कृतीचे जतन करण्यावरही विद्यालयात भर दिला जात असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, शिकण्याची जिद्द आणि शिस्तबद्ध वातावरण यामुळे विद्यालयाने ग्रामीण भागातील निवासी शिक्षण व्यवस्थेसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे पत्रकारांनी नमूद केले.
विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचल्याचेही यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थिनींचे भोजन, परिसरातील स्वच्छता, निवास व्यवस्था आणि शैक्षणिक वातावरण यांचीही पाहणी करण्यात आली.
विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थिनींना सुमारे एक हजार वह्या, पेन, पेन्सिल, इतर शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थिनींना या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पत्रकारांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाच्या आवडी, भविष्यातील ध्येय आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थिनींना समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी व आपल्या परिसरातील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेण्याचे आवाहनही करण्यात आले. भविष्यात आपणही पत्रकारिता क्षेत्रात येऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकता, असा संदेश उपस्थित पत्रकारांनी विद्यार्थिनींना दिला.
आश्रमशाळांच्या गुणवत्तेबाबत आत्मचिंतनाची गरज
या विद्यालयाच्या पाहणीच्या निमित्ताने शासनाच्या निवासी आश्रमशाळांच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. एका बाजूला शासनाकडून शासकीय आश्रमशाळांसाठी मोठ्या इमारती, सुसज्ज भोजन व्यवस्था, केंद्रिय स्वयंपाकगृह तसेच शिक्षकांच्या वेतनावर मोठा खर्च केला जात असताना काही ठिकाणी शिस्त, स्वच्छता, भोजनाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत तक्रारी समोर येतात. दुसऱ्या बाजूला तुलनेने मर्यादित साधनसामग्री आणि अल्प मानधनात काम करणाऱ्या संस्थांच्या निवासी शाळा गुणवत्ता, शिस्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत चांगली कामगिरी करताना दिसतात, अशी तुलना यावेळी करण्यात आली.
शासन आणि प्रशासनाने अशा चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्या शासकीय आश्रमशाळांमध्येही राबविण्याची गरज आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी अशा विद्यालयांना भेटी देऊन तेथील भोजन व्यवस्था, स्वच्छता, शिस्त, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांचे कार्यपद्धतीचे अनुकरण करण्यासारखे काय आहे, याचा अभ्यास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनीही अशा गुणवत्तापूर्ण निवासी विद्यालयांना भेट देऊन तेथील चांगल्या उपक्रमांची माहिती घेण्याबरोबरच शासकीय आश्रमशाळांमध्ये त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
पत्रकार बांधवांचा मोठा सहभाग
या अभ्यास दौऱ्यात मराठी पत्रकार परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष विजय घरत, पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कोकण विभाग अधिस्वीकृती समिती सदस्य हर्षद पाटील, कार्याध्यक्ष मंगेश तावडे, डिजिटल मीडिया अध्यक्ष शशिकांत कासार, सचिव सुमित पाटील, खजिनदार रुपेश मोकाशी, उपाध्यक्ष नाजीम खतीब, मयूर ठाकूर, सुशांत संखे, शेखर पवार,सत्यवान तरे अमोल रायपुरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच पत्रकार बांधवांमध्ये स्नेह व संवाद वाढावा यासाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रयोगांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यास तसेच शिक्षण व निवासी शाळांच्या व्यवस्थेबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्यास मदत झाली.