कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा सत्ताधारी नेत्यांना सवाल; जनतेच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे आवाहन
पालघर : भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व्यासपीठावर झालेला वाद सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. व्यासपीठावर कोणाला बसण्याचा अधिकार आहे, यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांना सवाल केले जात आहेत. मात्र, या राजकीय वादावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांचे लक्ष जनतेच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले आहे.
“व्यासपीठावर कोण बसले, यापेक्षा वाढवणच्या आंदोलनस्थळी कोण बसले आहे, याची काळजी करा!” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात स्थानिक मच्छीमार, आदिवासी बांधव आणि हजारो भूमिपुत्र गेल्या ११५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आपल्या हक्काच्या जमिनींसाठी आणि समुद्राच्या संरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर रात्र काढून संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रश्नांकडे सत्ताधारी नेत्यांचे कितपत लक्ष आहे, असा प्रश्न कॅप्टन ठाकूर यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, रस्ते, महामार्ग, आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर पालकमंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालघरच्या जनतेने लोकप्रतिनिधींना राजकीय वर्चस्वासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी निवडून दिलेले नाही. जनतेचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवावेत आणि जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
एकमेकांना सवाल करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. राजकीय वाद आणि व्यासपीठावरील स्थान यापेक्षा वाढवणच्या आंदोलनस्थळी संघर्ष करणाऱ्या भूमिपुत्रांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या, असे आवाहन कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी केले.
जनता रस्त्यावर आहे आणि सत्ताधारी आपापसात भांडण्यात व्यस्त आहेत, हीच आज पालघरची शोकांतिका आहे! अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून दिली.
— कॅप्टन सत्यम ठाकूर
जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पालघर
