राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १२ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; पालघर जिल्ह्यात मनसे संघटनात्मक विस्तारावर भर
पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात पक्ष संघटनेची बांधणी आणि विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद गटांसाठी १२ पदाधिकाऱ्यांवर उपतालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये तन्मय संखे यांची खैरेपाडा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तन्मय (भाऊ) संखे यांच्या राजकीय वाटचालीतील हा नवा टप्पा मानला जात आहे. मनसे नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत खैरेपाडा जिल्हा परिषद गटाची जबाबदारी सोपविली आहे. पक्ष संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणे, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि नागरिकांशी संपर्क वाढविणे, अशी जबाबदारी त्यांच्यासमोर असणार आहे.
मनसेच्या नियुक्तीपत्रानुसार पालघर जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये विजय बाळू गांगुर्डे यांची सरावली जिल्हा परिषद गटासाठी, वैभव नाईक यांची पारश्वळ जिल्हा परिषद गटासाठी, जयेश आहाडी यांची सिंगाव जिल्हा परिषद गटासाठी, निलेश पाटील यांची बहाणपूर जिल्हा परिषद गटासाठी, सिद्धेश पाटील यांची मनोर जिल्हा परिषद गटासाठी, नितीन गावड यांची सफाळे जिल्हा परिषद गटासाठी, राजेंद्र तरे यांची भाताणे जिल्हा परिषद गटासाठी, गणेश जाधव यांची चंद्रपाडा जिल्हा परिषद गटासाठी, विशाल संखे यांची बोईसर-काटकर जिल्हा परिषद गटासाठी आणि सत्यम मिश्रा यांची बोईसर-दांडीपाडा जिल्हा परिषद गटासाठी उपतालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जाई संजय किणी यांची पालघर येथे उपतालुका अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवावेत, कोणतीही कुचराई अथवा तडजोड करू नये आणि आपल्या वर्तनामुळे समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या एक वर्षाच्या कालावधीसाठी असून पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही पत्रात नमूद आहे.
पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आता नवनियुक्त पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक कामाला किती गती देतात आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर कशा पद्धतीने काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तन्मय संखे यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी अभिनंदन होत आहे.
