तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सूर्या व्हॅली स्कूलचे दणदणीत यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सूर्या व्हॅली स्कूलचे दणदणीत यश

उमरोळी, जनतेचा वाली दि. १३ : येथील नूतन विद्यालयात १२ व १३ डिसेंबर रोजी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सूर्या व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भव्य यश संपादन केले. या प्रदर्शनात शाळेकडून सादर करण्यात आलेल्या तिन्ही प्रकल्पांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठळक छाप उमटली आहे.

सूर्या व्हॅली स्कूलतर्फे माध्यमिक, प्राथमिक आणि दिव्यांग अशा तीन गटांमध्ये प्रकल्प सादर करण्यात आले होते. माध्यमिक गटात कु. ऋत्वि निलेश नाईक आणि कु. अथर्व विजय रावते यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. प्राथमिक गटात कु. अनन्या सुभाष घाटाळ, कु. सूर्याणी गणेश तांबडी आणि कु. सई मयूर पाटील यांनी वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे मांडत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दिव्यांग गटात कु. कार्तिक गोखले आणि कु. ध्रुव अभिनय पाटील यांनी सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम पारितोषिक देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये नाविन्य, उपयुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम दिसून आला. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्या व्हॅली स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *