वाडा : दुष्काळमुक्त गावांच्या निर्मितीसाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे उभी करण्याचा संकल्प जिल्हा परिषद पालघरने केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत वाडा तालुक्यातील खडकोना येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्वतः श्रमदानात सहभागी होत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांसमोर लोकसहभागाचा आदर्श निर्माण केला.
या उपक्रमात जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि स्थानिक घटकांनी एकत्र येत श्रमदान केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) दिलीप पाडवी, कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, मनरेगाचे गटविकास अधिकारी राजेश पाटील, कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) सतेश शिंदे आणि विस्तार अधिकारी राजू कोळी यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या कामात सहभाग नोंदविला.
वनराई बंधाऱ्याच्या उभारणीमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजलपातळीत वाढ होण्यासह विहिरींच्या पाणीसाठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. याचा लाभ स्थानिक शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही होऊ शकतो. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, मृद व जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या माध्यमातून ग्रामविकासाला लोकसहभागाची जोड देण्याबरोबरच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, जलसंधारणाची कामे केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता त्यांची सातत्याने देखभाल आणि गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाडा तालुक्यातील खडकोना येथे श्रमदानातून उभारण्यात आलेला वनराई बंधारा हा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न ठरत आहे.
जिल्हा परिषद पालघर | दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६
