दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची तत्परता; पात्र शेतकऱ्यांना पुढील चार दिवसांत मदत मिळणार – राज्यमंत्री योगेश कदम
पालघर : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर प्रशासनाने स्वतः शेतकऱ्यांच्या दारात पोहोचून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे स्पष्ट निर्देश गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांना पुढील चार दिवसांत प्राथमिक आर्थिक मदत मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे राज्यमंत्री योगेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांनी दिवाळीचा सण शेतकऱ्यांसोबत साजरा केला. यावेळी ग्रामस्थांना दिवाळी फराळाची भेट देण्यात आली.
शेतकऱ्यांसोबत साजरी होणारी ही दिवाळी आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची दिवाळी असल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाही आदिवासी बांधवांनी आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपत केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
हट्टीपाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर शासनाच्या प्राथमिक स्वरूपातील पाच हजार रुपयांच्या मदतीअंतर्गत अनेक बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप मदत न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पुढील चार दिवसांत मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ई-केवायसी किंवा आवश्यक कागदपत्रांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची मदत रखडू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी थेट पाड्यावर जाऊन विशेष शिबिर आयोजित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी तहसील कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्याने कार्यालयात येण्याऐवजी अधिकाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले पाहिजे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. प्राथमिक आर्थिक मदतीबरोबरच शेतीच्या प्रत्यक्ष नुकसानीची मुख्य भरपाई मिळवून देण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील
मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक अजित साबळे, नायब तहसीलदार डॉ. बाळाराम भला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
