बळीप्रतिपदेची परंपरा आजही कायम! गुराढोरांची संख्या घटली, मात्र ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचा उमरोली ग्रामस्थांचा प्रयत्न

Share:

दिवाळीतील बळीप्रतिपदा हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण. शेतीमध्ये वर्षभर शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या गुराढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी गुरांना सजवून त्यांची पूजा केली जाते. तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी गवत आणि कचरा एकत्र करून त्यावर दीप लावून पूजा केल्यानंतर तो पेटवण्याची पारंपरिक प्रथा आजही जपली जाते.

मात्र, काळ बदलला तशी ग्रामीण जीवनशैलीही बदलली आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात बैलजोडी आणि गुराढोरे असायची. परंतु आता आधुनिक शेती, ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही गुरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण घटले असून, प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी गाई-म्हशी पाळल्या जात आहेत.

त्यामुळे पूर्वीसारखा गुराढोरांच्या सहभागात बळीप्रतिपदेचा आनंद साजरा करता येत नसला, तरी पालघर तालुक्यातील उमरोली गावात ग्रामस्थांनी संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावात ठिकठिकाणी गवत आणि कचरा एकत्र करून दीप प्रज्वलित करत पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. गुराढोरांची संख्या कमी असली तरी परंपरेची ज्योत मात्र विझू दिलेली नाही, हे उमरोलीतील ग्रामस्थांच्या उत्साहातून दिसून आले.

विशेष म्हणजे, बळीप्रतिपदा हा केवळ शेती आणि पशुधनाशी संबंधित सण नाही, तर कुटुंबातील नातीगोती एकत्र आणणारा दिवसही आहे. मोबाईलच्या आणि धावपळीच्या जगात एकमेकांपासून दूर गेलेली माणसे या सणाच्या निमित्ताने कुटुंबासह एकत्र येतात. जुन्या आठवणींना उजाळा देत परंपरा आणि संस्कृतीचा आनंद लुटतात.

आधुनिकतेच्या प्रवाहात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली, शेतीचे स्वरूप बदलले; मात्र ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची उमरोली ग्रामस्थांची धडपड आजही कायम आहे. गुरे कमी झाली, पण परंपरेवरील प्रेम कमी झालेले नाही, हाच बळीप्रतिपदेचा खरा संदेश!

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *