पालघर जिल्ह्याच्या समस्या मांडणारे रोखठोक व्यासपीठ
४७ बॉक्स मद्य जप्त केल्याचा दावा; चालक-वाहक फरार कसे? वीस पत्रकारांची यादी तयार करून कथित मद्यवाटपासाठी फोनाफोनी; काही पत्रकारांनी भेट नाकारून मद्य परत केल्याची चर्चा; डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!
प्रसिद्धीपत्रकातील दावे आणि प्रत्यक्ष घटनाक्रम
पालघर : परराज्यातून अवैध मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईचे प्रसिद्धीपत्रक काढून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या कारवाईच्या प्रसिद्धीपत्रकातील दावे आणि प्रत्यक्ष घटनाक्रम यामध्ये तफावत असल्याचे आरोप पुढे येत असून, चारोटी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपलब्ध प्रसिद्धीपत्रकानुसार, आयशर वाहन क्रमांक MH-04/HY-0528 मधून गोवा राज्यातील मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याचे एकूण ४७ बॉक्स जप्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाहनाची किंमत २५ लाख रुपये, तर मद्याची किंमत ८ लाख ४ हजार रुपये असल्याचा उल्लेख करून एकूण ३३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र, या कारवाईमागील वास्तविक घटनाक्रम काय आहे, हा खरा प्रश्न आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मद्यवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर पलटी झाल्यानंतर घटनास्थळी मद्याच्या बाटल्या विखुरल्या होत्या. त्यानंतर त्यातील काही मद्याची अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची चर्चा आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतरच उत्पादन शुल्क विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विभागाला या अवैध मद्यवाहतुकीची माहिती स्वतःच्या गुप्त यंत्रणेमार्फत मिळाली होती की अपघातानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पथक घटनास्थळी पोहोचले, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला, तर त्याचा चालक आणि वाहक नेमके कुठे गेले? त्यांना ताब्यात घेण्यात आले की फरार दाखवण्यात आले? वाहनाचा मालक कोण, मद्याचा पुरवठादार कोण आणि या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास कितपत झाला? केवळ वाहन आणि मद्य जप्त करून कारवाईचे श्रेय घेणे पुरेसे आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत.
जप्त मद्य पत्रकारांना भेट म्हणून देण्याचा प्रयत्न?
या प्रकरणाला आता आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. दिवाळीनिमित्त काही पत्रकारांना दमण बनावटीचे मद्य भेटवस्तू म्हणून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पुढे आला आहे. विशेष म्हणजे, हे मद्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या मद्याच्या साठ्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुमारे वीस पत्रकारांची यादी तयार करून त्यांना फोनद्वारे संपर्क साधत मद्यवाटप करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, संबंधित मद्य दमण बनावटीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर काही पत्रकारांनी ही भेट स्वीकारण्यास नकार देत परत केल्याचे सांगितले जात आहे.
जर जप्त केलेले मद्य खरोखरच पत्रकारांना भेटवस्तू म्हणून देण्याचा प्रयत्न झाला असेल, तर हा केवळ पत्रकारितेच्या नैतिकतेचा प्रश्न नसून जप्त मुद्देमालाच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय मालमत्तेच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेचाही गंभीर विषय आहे. राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले मद्य जप्त केल्यानंतर त्याची नोंद, साठवणूक, पंचनामा आणि नियमानुसार विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे.
मग जप्त मद्याचा साठा पत्रकारांना देण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न कोणी केला? वरिष्ठ अधिकाऱ्यांची याला परवानगी होती का? संबंधित कर्मचाऱ्यांना असे वाटप करण्याचे आदेश कोणी दिले? वीस पत्रकारांची यादी कोणी तयार केली? जप्त केलेल्या मद्याचा किती साठा उपलब्ध आहे, किती मद्य नियमानुसार नष्ट करण्यात आले आणि किती मद्याचे वितरण झाले, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे.
जप्त मद्याच्या अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष शिल्लक साठ्याची पडताळणी केल्यास या प्रकरणातील सत्य समोर येऊ शकते. अन्यथा जप्त मुद्देमालाच्या साठ्यात तफावत निर्माण झाली आहे का, असा संशय अधिक बळावू शकतो.
डहाणू विभागावर मासिक वसुलीचे आरोप
दुसरीकडे, डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षेत्रात काही हॉटेल्स आणि वाईन शॉपमधून कथित मासिक आर्थिक वसुली होत असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. मिळालेल्या आरोपांनुसार, काही हॉटेल्सकडून महिन्याला प्रत्येकी १२ हजार रुपये, तर वाईन शॉप दुकानांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे.
या कथित वसुलीच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी झाल्यास मोठे वास्तव समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
उत्पादन शुल्क विभागाला थेट सवाल
- टेम्पो पलटी होण्यापूर्वी विभागाला या वाहनाची माहिती होती का?
- घटनास्थळी सर्वप्रथम ग्रामस्थ, पोलीस की उत्पादन शुल्क विभाग पोहोचले?
- चालक आणि वाहक यांच्यावर काय कारवाई झाली?
- ४७ बॉक्स मद्यापैकी प्रत्यक्ष किती मद्य जप्त झाले?
- जप्त केलेल्या मद्याची अधिकृत नोंद कुठे आहे?
- दिवाळीनिमित्त पत्रकारांना मद्य भेट देण्याचा प्रयत्न कोणी केला?
- वीस पत्रकारांची यादी कोणी तयार केली?
- जप्त मद्याचे वाटप करण्यास कोणाची परवानगी होती?
- जप्त मद्याचा शिल्लक साठा आणि प्रत्यक्ष नोंदी यांची तपासणी होणार का?
- हॉटेल्स आणि वाईन शॉपमधून कथित मासिक वसुली होत असल्याच्या आरोपांची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार का?
कारवाईचे श्रेय घेणाऱ्यांनी जप्त मद्याच्या साठ्याचा हिशेबही जनतेला द्यावा.
निष्पक्ष चौकशी गरजेची
अवैध मद्यवाहतुकीवर कारवाई करणे ही विभागाची जबाबदारी आहे; मात्र जप्त केलेल्या मुद्देमालाचे कथित वाटप झाल्याचे आरोप समोर येत असतील, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रसिद्धीपत्रकातून कारवाईचे यश सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनाक्रम, जप्त मद्याचा हिशेब आणि कथित वाटपामागील सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
‘जनतेचा वाली’ या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करणार असून, डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारातील आणखी काही महत्त्वाचे मुद्दे उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधितांची बाजू तपासून उद्याच्या विशेष वृत्तातून जनतेसमोर मांडणार आहे.
- महिन्याकाठी लाखोंच्या कथित वसुलीच्या आरोपांमागील सत्य काय?
- अवैध मद्यवाहतुकीच्या तस्करांना कोणाचे अभय आहे का?
- जप्त मद्य पत्रकारांना भेट देण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला?
- जप्त मुद्देमालाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आहे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अन्य संबंधितांची बाजूही प्रसिद्ध केली जाईल.
