बातमीपत्र | पालघर
दिनांक : ७ नोव्हेंबर २०२६
अवैध दारूवर कारवाई करणाऱ्या विभागावरच गंभीर प्रश्न; अधीक्षकांनी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी
पालघर : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. मात्र, पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पत्रकारांना कथितरीत्या दमण बनावटीच्या दारूचे वाटप करण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अवैध दारूची तस्करी रोखण्याची जबाबदारी असलेल्या विभागाकडूनच असा प्रकार घडल्याचा आरोप होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात अवैधरीत्या आणलेल्या आणि विक्रीस प्रतिबंधित असलेल्या दारूविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. पालघर जिल्हा दमण आणि गुजरातच्या सीमेलगत असल्याने या भागातून अवैध दारूची वाहतूक आणि तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान विभागासमोर आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना कथितरीत्या दारू भेट देण्यात आल्याच्या चर्चेमुळे विभागाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
जप्त केलेल्या दारूचे वाटप होते की खास मागवलेला साठा?
उत्पादन शुल्क विभागाने कारवाईदरम्यान जप्त केलेली दारू पुन्हा बाहेर काढून तिचे वाटप करण्याचा किंवा विक्री करण्याचा प्रकार सुरू केला आहे का? पत्रकारांना देण्यात आलेली कथित दारू जप्त केलेल्या साठ्यातील होती की दमणहून स्वतंत्रपणे आणण्यात आली होती? या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाने देणे आवश्यक आहे.
कारवाई करण्याऐवजी भेटवस्तू वाटपाचा धंदा कधीपासून सुरू झाला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पत्रकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न?
पत्रकारांना दिवाळी भेट देण्यामागे नेमका उद्देश काय होता? विभागाच्या कारभाराविषयी बातम्या प्रसिद्ध होऊ नयेत किंवा गैरप्रकारांवर पडदा टाकला जावा, यासाठी हा कथित प्रकार करण्यात आला होता का? अशा चर्चांनाही जिल्ह्यात उधाण आले आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
उत्पादन शुल्क अधीक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करावा!
चोरावर मोर
या कथित प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र आणि सखोल चौकशी करावी. पत्रकारांना देण्यात आलेल्या दारूचा स्रोत, जप्तीची नोंद, साठ्याचा तपशील आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका तपासावी. दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात नियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
अवैध दारू पकडण्याची जबाबदारी असलेल्या विभागाकडूनच दारू वाटपाचे आरोप होत असतील, तर हा केवळ दिवाळी भेटीचा विषय नसून प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यामुळे पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
— संपादक : विजय घरत
