१२ रुपये शासनदर, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र ४ ते ६ रुपये! जिल्हाधिकारी कारवाई करणार तरी कधी?

Share:

पालघरमध्ये पावली-गवताची कमी दराने खरेदी; खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा कुणबी सेनेचा आरोप

पालघर : पालघर जिल्ह्यातील पावली आणि गवत उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनदर १२ रुपये प्रतिकिलो असताना खासगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या ४ ते ६ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होत असल्याचा आरोप कुणबी सेना पालघर जिल्ह्याने केला आहे. शासनाचा निर्णय कागदावरच राहणार की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पालघर जिल्ह्यातील शेतकरी भातशेतीसोबत पावली आणि गवत उत्पादनावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने निर्धारित केलेला दर आणि प्रत्यक्ष बाजारातील खरेदीदर यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कुणबी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, शेतकऱ्यांना किमान १२ रुपये प्रतिकिलो दर मिळावा, खासगी व्यापाऱ्यांच्या खरेदी व्यवहारांवर नियंत्रण ठेवावे आणि शासनदराची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, कृषी विभाग, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शासनाने दर निश्चित करूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसेल, तर या निर्णयाचा उपयोग काय? व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी होत असताना प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार?

शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? पालघर जिल्हाधिकारी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देणार की शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीवरच अवलंबून राहावे लागणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शासनदराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून पावली आणि गवत उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *