राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई; इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
प्रतिनिधी – निशिगंधा मोरे
बदलापूर : रोज रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बदलापूरच्या संजय महादेव दाभोळकर यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे. हरियाणा येथे झालेल्या रॉक पॉवरलिफ्टिंग संघटनेच्या सोळाव्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतातर्फे त्यांची निवड झाली आहे.
हरियाणा येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दाभोळकर यांनी आपल्या ताकदीची आणि कौशल्याची छाप उमटवली. आता २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मास्टर फोर गटातील ७५ किलो वजनी गटात, ५५ ते ६० वर्षे वयोगटातील खेळाडूंमध्ये ते सहभागी होणार आहेत.
रिक्षा चालवण्याच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून पॉवरलिफ्टिंगसारख्या मेहनत, शिस्त आणि सातत्याची कसोटी पाहणाऱ्या खेळात यश मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे. नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक खंबीरपणाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदके पटकावली. त्यांच्या या यशातून वय हा यशाच्या मार्गातील अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे सिद्ध झाले आहे.
संजय दाभोळकर हे क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबरोबरच संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळत आहेत. ते रॉक पॉवरलिफ्टिंग संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असून भारतीय संघटनेत संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेतील यशानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे.
सामान्य परिस्थितीतून पुढे येत राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकणारे संजय दाभोळकर आता इंग्लंडमध्ये भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. कामाचा व्याप आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी दमदार कामगिरी करून भारतासह महाराष्ट्राचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत.
रिक्षाचालक ते आंतरराष्ट्रीय खेळाडू! संजय दाभोळकर यांच्या या यशाचे बदलापूर परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या सुवर्णभरारीने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
