वसई-विरार कुणबी अस्मिता संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी, वसतिगृह उभारणीचा संकल्प

वसई : जनतेचा वाली ,वसई-विरार कुणबी अस्मिता संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (२६ ऑगस्ट) ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसई-विरार महानगरपालिकेचे नगरसेवक पंकज पाटील, समाजसेवक गजानन पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ तसेच देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक तुकाराम पष्टे यांनी गेल्या तीन वर्षांत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. विवाह इच्छुक कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कुणबी जोडीदार’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ही सुविधा केवळ कुणबी समाजासाठी असून, संपूर्ण महाराष्ट्रातील विवाह इच्छुक युवक-युवतींना त्यामध्ये नोंदणी करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा इतर कार्यक्रमांऐवजी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याअंतर्गत वसई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा रक्तगट नोंदवून ठेवण्यास मदत होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो.
दरम्यान, ग्रामीण भागातून वसई-विरार परिसरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था उभारण्याचे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन गणपत पाटील यांनी सांगितले. या कार्यासाठी आजवर करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. या प्रयत्नांना अपेक्षित यश अद्याप मिळाले नसले, तरी भविष्यात वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटक राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या वसतिगृह उभारणीच्या संकल्पाला पाठिंबा देत, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण आणि आपले सहकारी संस्थेच्या पाठीशी राहू, असे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर निवासाची मोठी अडचण भेडसावते. त्यामुळे वसतिगृहाची उभारणी ही समाजासाठी महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजाची एकजूट असेल तर कोणतेही सामाजिक कार्य अडत नाही, असे मत नगरसेवक पंकज पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेच्या उपक्रमांना आपलाही भरीव वाटा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मनोज सातवी यांनीही आपल्या शिक्षणाचा अनुभव सांगताना वसतिगृहाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे वसतिगृह उभारणीचे काम शक्य तितक्या लवकर हाती घ्यावे, त्यासाठी समाजाला जोडण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल, असे त्यांनी सांगितले.




कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर, सदस्य, महिला मंडळ, देणगीदार आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत आणि समाजातील युवक-युवतींसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.