
पालघरच्या रानमेव्याला बाजारपेठ; महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग
‘रानभाजी पाककृती पुस्तिकेचे’ अनावरण; एका दिवसात सुमारे ५ ते ६ हजारांची विक्री
पालघर : प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर जिल्ह्याच्या डोंगर-दऱ्यांमध्ये आणि नैसर्गिक अधिवासात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे आहारातील महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद परिसरात झालेल्या या महोत्सवाला नागरिकांचा तसेच महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवात पालघर जिल्ह्याच्या विविध भागांतील ८ ते १० शेतकरी व महिला बचत गट सहभागी झाले होते. कर्टुली, कुर्डू, नाळभाजी, शेवग्याचा पाला, शतावरी, टाकळा, शिंद, बांबू किळ, फुलमाठ, अंबाडी, आगाडा, अळू कंद, कोळीभाजी, करवंद, कंद, उंबर, शेवली आदी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच त्यापासून तयार करण्यात आलेल्या पाककृती मांडण्यात आल्या.
यावेळी कृषी विभाग आणि पुकार संस्थेच्या पंचम प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘रानभाजी पाककृती पुस्तिकेचे’ अनावरण मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीफ मसलत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
रानभाज्यांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म लक्षात घेता नागरिकांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन मनोज रानडे यांनी केले.
महिला बचत गटांना उत्पन्नाचे साधन
महोत्सवात प्रदर्शनाबरोबरच रानभाज्यांची विक्रीही करण्यात आली. प्रत्येक महिला बचत गटाने सुमारे ७०० ते १२०० रुपयांपर्यंतची विक्री केली, तर एका दिवसात एकूण अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण करण्याच्या दृष्टीने महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला.
पालघरच्या नैसर्गिक अधिवासात उपलब्ध असलेल्या मौल्यवान व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या विक्रीसाठी महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य झाला. नागरिकांनी रानभाज्यांचा आहारात समावेश करण्याबरोबरच स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी यांनी केले.
— जनतेचा वाली
पालघर जिल्ह्याचा जनतेचा आवाज