टाटा कॅपिटलच्या सामाजिक उपक्रमांतून साडेपाच लाख नागरिकांना लाभ; पालघरमधील आदिवासी भागांनाही विकासाचा हातभार

Share:

शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण आणि सौरऊर्जेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत असून, टाटा कॅपिटलच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) राज्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमांचा महाराष्ट्रातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ झाला असून, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण, अक्षय ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टाटा कॅपिटलच्या देशभरातील एकूण सामाजिक उत्तरदायित्व खर्चापैकी सुमारे ३० टक्के खर्च महाराष्ट्रात करण्यात आला आहे. देशभरात कंपनीच्या विविध उपक्रमांचा लाभ ३७ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ‘पंख शिष्यवृत्ती’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ६ हजार ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय आर्थिक साक्षरता कार्यक्रमातून शासकीय शाळांमधील ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान देण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि STEM विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

२६ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण

‘प्रोअस्पायर’ उपक्रमांतर्गत राज्यातील २६ हजारांहून अधिक युवक, महिला, आदिवासी आणि दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, उद्योजकता आणि व्यावसायिक कौशल्यांच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पालघरमध्येही आरोग्य आणि नेत्रसेवेला प्राधान्य

‘आरोग्यतारा’ उपक्रमांतर्गत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यात आली आहे. मोतीबिंदू, काचबिंदू आणि दृष्टिदोष तपासणीसह आवश्यक उपचार व शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयांच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कर्करोग प्रतिबंध आणि तपासणीसंबंधी उपक्रमांचाही ३० हजारांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे.

जलसंधारणातून ६० गावांना जलसुरक्षेचा आधार

‘जलआधार’ उपक्रमांतर्गत पालघर, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांतील ६० हून अधिक गावांमध्ये जलसुरक्षेसाठी काम करण्यात आले आहे. या माध्यमातून एक लाख ३० हजारांहून अधिक नागरिकांना लाभ झाला असून, ६०० हून अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. दरवर्षी ८ हजार ५०० लाख लिटरपेक्षा अधिक पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुर्गम आदिवासी वस्त्यांमध्ये सौरऊर्जेचा प्रकाश

‘द ग्रीन स्विच’ उपक्रमातून पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील १९ दुर्गम वस्त्यांमधील ५८० हून अधिक वीजवंचित घरांना सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पथदिवे आणि सार्वजनिक इमारतींनाही सौरऊर्जेचा लाभ मिळत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी ३० हजार रोपांची लागवड

ठाण्यातील पारसिक टेकडी परिसरात ‘वनारोपण फॉर न्यूट्रॅलिटी’ उपक्रमांतर्गत मियावाकी पद्धतीने ४० हून अधिक स्थानिक प्रजातींच्या ३० हजारांपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, जलसंधारण आणि पर्यावरण या क्षेत्रांत शासन, उद्योग क्षेत्र आणि स्थानिक समुदायांनी एकत्रितपणे काम केल्यास महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला गती मिळू शकते. टाटा कॅपिटलच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतून राज्यातील वंचित, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *