वीजमीटर मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला ACB ने रंगेहात पकडले

Share:

पालघरमध्ये महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. नवीन वीजमीटर मंजूर करून देण्यासाठी नागरिकांकडे पैशांची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

तब्बल २२ नवीन वीजमीटर मंजुरीसाठी सुरुवातीला ११ हजार रुपयांची मागणी, तर तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी संबंधित अभियंत्याने दर्शविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी श्रीकृष्ण समाधान राजस या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याविरोधात वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील आचोळे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली आणि २० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असतानाही वीजमीटर मंजुरीसाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात सामान्य नागरिकांची अशाच प्रकारे आर्थिक पिळवणूक केली जातेय का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

आता या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का आणि महावितरण प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वीजमीटरसाठीही लाचेचा मीटर सुरू आहे का? असा सवाल आता पालघरमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *