पालघर, दि. १३ नोव्हेंबर : पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या विकासाला आपण प्रथम प्राधान्य देणार असून, विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेऊन काम करणार असल्याची ग्वाही वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभवाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांनी विकास प्रक्रियेत एकमेकांचे सहकारी म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या यंत्रणेकडून किंवा व्यक्तीकडून त्रुटी झाल्यास तातडीने टीका करण्याऐवजी समजावून सांगून सकारात्मक मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईला मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या यशाचा दाखला देताना नाईक यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या सामूहिक योगदानाचे कौतुक केले. कोणत्याही शहराचा विकास हा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून होत नसून, सर्व घटकांनी पहारेकऱ्याची भूमिका बजावल्यासच विकासाला गती मिळते, असे त्यांनी नमूद केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांनी समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर ठेवण्याची गरज व्यक्त केली. पालघर जिल्ह्यातूनही भविष्यात समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारी व्यक्तिमत्त्वे घडावीत, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाच्या दिशेने काम करीत आहे. मात्र, विकास केवळ कागदोपत्री न राहता त्याचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभातून दिसले पाहिजेत, असेही पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.


यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.
