नागझरी येथे २४ नोव्हेंबरला लोकार्पण सोहळा; नामदेव भाऊ पाटील यांच्या सामाजिक संस्कारांचा पुढील पिढीकडूनही वारसा
नागझरी : समाजात पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त होत असताना स्वतःच्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणारी माणसे आजही माणुसकीचा विश्वास जिवंत ठेवत आहेत. स्वतःच्या कुटुंबापुरता विचार न करता समाजाच्या भावी पिढीच्या गरजा ओळखून भव्य सभागृह उभारण्याचे दातृत्व दाखवणाऱ्या पाटील कुटुंबाचे कार्य याच सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाला स्वर्गीय नामदेव भाऊ पाटील यांच्या कुटुंबाकडून लाभलेले सहकार्य सुमारे तीन दशकांची सामाजिक परंपरा सांगणारे आहे. युवक मंडळाने समाजोपयोगी कामांसाठी मागणी केली आणि पाटील कुटुंबीयांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. ‘मंडळाने मागणी केली, आम्ही देत गेलो,’ या भावनेतून समाजसेवेची प्रेरणा अधिक दृढ होत गेली. याच विचारातून समाजासाठी जमीन विकत घेऊन सभागृह उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.
स्वर्गीय श्रीमती अनुसया नामदेव पाटील (दुर्वेस) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागझरी येथे उभारण्यात आलेली ही वास्तू सामाजिक एकोपा, संस्कृती, कला, क्रीडा आणि परंपरा जोपासण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पुंडलिक नामदेव पाटील आणि विलास नामदेव पाटील यांनी वडिलांकडून मिळालेला दातृत्वाचा वारसा कृतीतून जपला आहे. विशेष म्हणजे, हे संस्कार पुढील पिढीतही रुजले असून नातवंडेही दातृत्वाची परंपरा पुढे नेत आहेत.
समाजसेवेची अतूट जोड
भिंतीच्या पलीकडली मानवता आणि माणुसकीची भिंत अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या कार्यातून येतो. तन-मन-धन समाजसेवेची अतूट जोड, मदतीचा हात आणि सेवेसी तत्पर राहण्याची वृत्ती हीच समाजाच्या प्रगतीची खरी पायरी आहे.
एखाद्या संस्थेचे छोट्याशा रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतर होत असताना समाजाचे सहकार्य आणि दात्यांचे योगदान मोलाचे असते. मात्र, विस्तारानंतरही समाजाशी असलेली नाळ कायम ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. पाटील कुटुंबीयांनी संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा मोठा असल्याचे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
या सभागृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागझरी येथे होणार आहे. दाते तथा उद्घाटक म्हणून पुंडलिक नामदेव पाटील आणि विलास नामदेव पाटील उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी असून विद्यमान अध्यक्ष वैभव नारायण पाटील यांच्यासह मंडळाचे विश्वस्तही उपस्थित राहणार आहेत.
समाजासाठी उभारलेली वास्तू ही केवळ बांधकामाची निर्मिती नसून अनेक पिढ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वाटचालीचा आधार ठरते. पाटील कुटुंबीयांचे हे योगदान समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनाही प्रेरणा देणारे आहे.
समाजातील अशा दानशूर व्यक्तिमत्त्वांना ‘जनतेचा वाली’चा मानाचा सलाम!
— जनतेचा वाली संपादक : विजय घरत
