बोईसरच्या धनानी नगरमधील बांधकामावर चार महिन्यांपासून कारवाई रखडली; कारवाई न करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
पालघर : पालघर तालुक्यातील खासगी तसेच शासकीय जमिनींवरील नियमबाह्य बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महसूल प्रशासनाकडून देण्यात आले असतानाही बोईसरमधील धनानी नगर येथील बांधकामावर गेल्या चार महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नियमबाह्य बांधकामांना अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासह नियमबाह्य बांधकामे थांबवून निष्कासित करण्याचे आदेश तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, बोईसर परिसरातील धनानी नगर येथील प्रकरणात या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
बोईसर येथील धनानी नगर परिसरातील सर्वे क्रमांक ३०/३, प्लॉट क्रमांक ३० या सलीम शहा यांच्या नावे सातबारा असलेल्या खासगी जमिनीवर नियमबाह्य बांधकाम सुरू असल्याचे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. सुमारे ४० फूट लांब आणि २० फूट रुंद आरसीसी कॉलम उभारून बांधकाम करण्यात येत असल्याचा अहवाल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे सादर केल्याचे सांगण्यात येते. मात्र, चार महिने उलटूनही कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे बोईसर शहर अध्यक्ष अभिनव चौधरी यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. नवीन नियमबाह्य बांधकाम सुरू झाल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचे निर्देश असतानाही प्रत्यक्षात कारवाई होत नसेल, तर आदेशांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील सर्वे क्रमांक १०० मधील नियमबाह्य शेडवर तातडीने कारवाई करण्यात आली. मग धनानी नगरमधील बांधकामाबाबत चार महिन्यांपासून प्रतीक्षा का? खासगी जागांवरील इतर बांधकामांवर कारवाई होत असताना या प्रकरणात वेगळी भूमिका का घेतली जात आहे? हा दुजाभाव आहे की प्रशासकीय दिरंगाई, याचे उत्तर महसूल प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
धनानी नगरमधील बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याची जबाबदारी निश्चित करणार कोण? बोईसर मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. चार महिन्यांपासून कारवाई प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई कधी होणार? नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईतही समानता दिसली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आदेश देऊनही कारवाई होत नसेल, तर अशा आदेशांना अर्थ काय? आता जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित बांधकामाची चौकशी करणार का आणि कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
