पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था सांभाळावी; दलाल आणि भांडवलदारांची बाजू घेऊ नये!

Share:
पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था सांभाळावी; भांडवलदारांचे हित जपू नये!

वाढवण बंदरविरोधी जनआक्रोश सभेत पोलीस प्रशासनाला थेट इशारा; कथित दलालांवरही वक्त्यांचा निशाणा

पालघर : वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विविध औद्योगिक आणि बंदर प्रकल्पांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश सभेत आंदोलकांनी राज्य सरकारसह पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे; मात्र भांडवलदार किंवा प्रकल्पसमर्थकांची बाजू घेऊन काम करू नये, असा स्पष्ट इशारा सभेतील वक्त्यांनी दिला.

वाढवण परिसरातील वरोर येथे झालेल्या या सभेत वाढवण बंदराच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या स्थानिक व्यक्तींनाही लक्ष्य करण्यात आले. बाहेरील शक्तींपेक्षा स्थानिक पातळीवर प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या काही व्यक्तींमुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप वक्त्यांनी केला. अशा कथित दलालांना जाब विचारण्याची आणि त्यांची भूमिका जनतेसमोर उघड करण्याची वेळ आली असल्याचे सांगत, ‘आता केवळ आंदोलन नाही, तर कृती करून दाखवण्याची वेळ आली आहे,’ अशी आक्रमक भूमिका सभेत मांडण्यात आली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने निष्पक्ष भूमिका बजावावी, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करण्याऐवजी त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी प्रशासनाने संवाद साधावा, अशी भूमिका वक्त्यांनी मांडली.

वाढवण बंदर, सफाळे परिसरातील प्रस्तावित एस्सार प्रकल्प आणि मुर्बे बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील पर्यावरण, मासेमारी व्यवसाय आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे करण्यात आली.

महाविकास आघाडीसह कोकणातील ५६ संघटनांनी या जनआक्रोश सभेला पाठिंबा दर्शविला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, मनसेचे नेते राजू पाटील, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या सभेत सहभागी झाले.

सभेत सरकारी अधिकारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली. प्रकल्पांच्या समर्थनार्थ उभ्या राहणाऱ्या शक्तींपेक्षा स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला आता अधिक व्यापक आणि आक्रमक स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र या जनआक्रोश सभेतून दिसून आले.

जनतेचा वाली | पालघर
Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *