तीन ते चार वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण; महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
डहाणू, दि. २२ ऑक्टोबर : डहाणू तालुक्यातील आगवन गावातील ग्रामस्थांची गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्यावरील पथदिव्यांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राच्या (ADTPS) सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत गावातील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्यावर पथदिवे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण रस्ता प्रकाशमान झाला आहे.

आगवन गावातील मुख्य रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नसल्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे अपघात तसेच सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत होता. याबाबत ग्रामस्थांकडून गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पथदिव्यांची मागणी केली जात होती. अखेर अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सीएसआर निधीतून हा प्रकल्प पूर्ण केला.
या पथदिवे प्रकल्पाचे उद्घाटन अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राचे मुख्य व्यवसाय अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भावेन शेठ (हेड-ओ अँड एम), नित्यानंद तिवारी (हेड-एचआर, प्रशासन व सीएसआर), कैलास नेरकर, स्नेहल जोशी (हेड-इलेक्ट्रिकल) आणि अविनाश फाटक (हेड-सीएसआर) उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अदाणी समूह आणि अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पथदिव्यांमुळे गावातील दैनंदिन व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत अदाणी व्यवस्थापनाचे आभार मानले.
स्थानिक समुदायांच्या गरजा ओळखून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारे उपक्रम राबविणे हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आगवन गावातील हा प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
