मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि नैसर्गिक संकटात त्यांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून नवी मुंबई येथील संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागर नाईक उपस्थित होते.
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची अनियमितता, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, अशा कठीण काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील प्रत्येक सक्षम घटकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून संदीप नाईक प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्याला आर्थिक आणि सामाजिक आधार मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानने हे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांनीही शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या एक कोटी रुपयांच्या योगदानातून देण्यात आला आहे.
