तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Share:

उद्योगमंत्र्यांच्या दबावामुळे एमआयडीसीची कारवाई रखडली?

जे-२०७ वरील कपड्यांच्या विक्रीने वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या कारवाईत दुजाभावाचा आरोप

तारापूर | प्रतिनिधी

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जे-२०७ येथे एस. जी. सिंथिटेक या वस्त्रोद्योग कंपनीने कारखान्याबाहेर भव्य पंडाल उभारून कपड्यांची विक्री सुरू केली आहे. या विक्रीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका माजी उद्योगमंत्र्यांचा दबाव असल्याच्या चर्चेमुळे एमआयडीसी प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक वळविल्याने कोंडीत आणखी भर

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याने अवजड वाहनांसह पालघर आणि डहाणूच्या दिशेने जाणारी बहुतांश वाहतूक सध्या मधुर नाका ते मुकुट नाका या मार्गावरून वळविण्यात आली आहे. आधीच वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर कारखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या कपड्यांच्या विक्री पंडालमुळे ग्राहकांची गर्दी आणि वाहनांच्या पार्किंगची समस्या अधिक गंभीर बनली आहे.

रस्त्याच्या परिसरात वाहनांची अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालकांना मार्गस्थ होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीवर याचा विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

एका पंडालवर कारवाई, दुसऱ्यावर प्रशासनाचे मौन?

या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे एमआयडीसी प्रशासनाच्या कारवाईतील कथित दुजाभाव. याच मार्गावरील एका दुचाकी विक्रेत्याने कारखान्याबाहेर उभारलेला पंडाल एमआयडीसी प्रशासनाच्या सूचनेनंतर तातडीने हटविण्यात आला होता. मात्र, एस. जी. सिंथिटेकसमोरील कपड्यांच्या विक्रीचा पंडाल अद्याप कायम असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एका ठिकाणी तातडीने कारवाई, तर दुसऱ्या ठिकाणी कथित दबावामुळे मौन, अशी एमआयडीसी प्रशासनाची भूमिका असल्याची चर्चा औद्योगिक क्षेत्रात रंगली आहे. मात्र, या कथित दबावाबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.

नियम कोणासाठी आणि कारवाई कोणावर?

औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक जागांचा वापर व्यावसायिक विक्रीसाठी कोणत्या नियमांच्या आधारे केला जात आहे? संबंधित पंडाल उभारण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे का? औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर समान निकषांनुसार कारवाई होणे अपेक्षित असताना, प्रशासनाच्या भूमिकेत भेदभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित पंडालच्या परवानगीची तपासणी करावी आणि नियमबाह्य असल्यास कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, नागरिकांना वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकवून ठेवले जाणार का? कथित दबावाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *