
काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते पदाधिकारी
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छ दिनानिमित्त (बीच क्लीन डे) १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील दांडी समुद्रकिनारी स्वच्छता व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस सेवा दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलासराव औताडे आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दांडी गावातील विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यात आले. यावेळी औताडे यांनी मंडळातील युवक, पुरुष व महिलांशी संवाद साधत समुद्रकिनाऱ्यांचे पर्यावरणीय महत्त्व, स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त किनाऱ्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन पालघर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आले. यावेळी सेवा दलाचे राजेंद्र तामारे, अस्लम शेख, दर्शना आरेकर, राखी प्रभु, मोहिनी प्रभु, वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष सचिन केणी, पालघर तालुका अध्यक्ष सुधीर डोके, डहाणू ग्रामीण अध्यक्ष विजय दळवी आणि डहाणू शहर अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते.
तसेच काँग्रेस पालघर कार्याध्यक्ष रोशन पाटील, असद चुनावाला, रजत मिश्रा आणि पालघर जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस मनोज पाटील यांच्यासह काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता नागरिकांनी नियमितपणे पर्यावरण संवर्धनात सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.