पालघर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’; २२ शासकीय सेवांचा नागरिकांना मिळणार थेट लाभ

​पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली ,महाराष्ट्र शासनाच्या ९ सप्टेंबर, २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना आणि २२ महत्त्वाच्या सेवांचा थेट लाभ उपलब्ध करून दिला जाणार असून गरजू लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केले आहे. या अभियानामध्ये महसूल, कृषी, ग्रामविकास व इतर विभागांशी संबंधित प्रमुख कामांचा निपटारा केला जाणार आहे. यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वन हक्क दावे मंजूर करणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नवीन नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी व मागणीपत्र देणे, प्रलंबित घरगुती वीज जोडणीस मंजुरी आणि वीज जोडणीत नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदवणे यांचा समावेश आहे. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन चालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, ७/१२ व ८-अ च्या नोंदी अद्ययावत करणे तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोजणीशी जोडणे या सर्व २२ सेवा एकाच ठिकाणी पुरविल्या जाणार असल्याने नागरिकांचा वेळ व हेलपाटे वाचणार आहेत. पात्र नागरिकांनी प्रचलित पद्धतीने संबंधित विभागांकडे अर्ज सादर करून शासनाच्या या लोककल्याणकारी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर तालुका तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *