पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा पुढाकार; पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन सादर

पूरात वाहून गेले संसार… पण माणुसकीचा हात ठरला आधार;


पालघर,जनतेचा वाली दि. २६ : पालघर तालुक्याच्या पूर्व विभागातील अतिवृष्टी आणि सूर्या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरग्रस्त झालेल्या गावांतील नागरिकांना तातडीने मदत मिळावी, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी आणि पुनर्वसनाची प्रभावी उपाययोजना करावी, या मागणीसाठी कुणबी समाजाचे सुर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभाग, सूर्या वैतरणा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच समाजातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काल शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी नागझरी किराट, बोरशेती, नानिवली आणि आंबेदे पालघर तालुक्यातील या पूरग्रस्त गावांना भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पूरामुळे घरांचे, शेतीचे, जनावरांचे तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. अनेक कुटुंबे अजूनही अन्न, पिण्याचे पाणी, वीज आणि निवाऱ्याच्या समस्येला सामोरे जात असल्याचे वास्तव समोर आले.
याच अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या आजच्या पालघर दौऱ्यादरम्यान युवक मंडळाचे अध्यक्ष वैभव नारायण पाटील, युवक मंडळाचे विश्वस्त तथा सूर्या वैतरणा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोज मोहन ठाकूर, युवक मंडळाचे माजी अध्यक्ष दिपेश दत्तात्रय पावडे, सहसचिव पंकज मनोहर ठाकूर , योगेश पाटील,योगेश सातवी, रोहित पाटील तसेच समाजातील आजी माजी पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानग्रस्तांचे पंचनामे, पुनर्वसन, सूर्या प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात पूरग्रस्त भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करणे, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा त्वरित पुरवठा करणे, रोग प्रतिबंधित फवारणी करणे,बेघर झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करणे तसेच शेतकरी, व्यापारी आणि इतर बाधित नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सुर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, सूर्या वैतरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि समाजातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज उर्वरित पूरग्रस्त गावांनाही भेट देणार असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर केवळ निवेदन न देता प्रत्यक्ष गावागावात जाऊन परिस्थितीची पाहणी करत शासनाशी संवाद साधण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *