छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धुकटणमध्ये पर्यावरणाचा जागर; संरक्षित वनक्षेत्रात भव्य वृक्षारोपण

धुकटणमध्ये पर्यावरणाचा जागर; वन विभागासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


पालघर, जनतेचा वाली दि. २६ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून धुकटण येथील संरक्षित वनक्षेत्रात भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान उत्साहात पार पडले. वन विभाग, वीर धरतीपुत्र संघटना, ग्रामपंचायत धुकटण आणि पालघर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील गंगाधर नांदवटे यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत, हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून हरित पालघर उभारण्याचे आवाहन केले.
उपक्रमात नागरिकांना वृक्ष लागवडीचे शास्त्रीय महत्त्व, जलसंधारण, मृदासंवर्धन आणि जैवविविधता जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असेही आवाहन करण्यात आले.
या अभियानात वीर धरतीपुत्र संघटनेचे सचिन भोईर व प्रशांत गोवारी, पालघर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल घरत, धुकटणच्या सरपंच प्रतिभा भोईर, उपसरपंच अपूर्वा अतुल घरत, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, १ जुलै २०२६ रोजी नवली येथील संरक्षित वनक्षेत्रात वृक्षारोपण आणि बीजगोळे प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
वन विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *