
प्रतिनीधी जनतेचा वाली
♟️ बोईसरमध्ये ‘चतुरंग उत्सव बुद्धिबळ स्पर्धा 2026’ जल्लोषात संपन्न
पालघर, प्रतिनिधी : बोईसर (पश्चिम) येथे दि. 26 एप्रिल 2026 रोजी ‘चतुरंग उत्सव बुद्धिबळ स्पर्धा – सीझन 2’ उत्साहात पार पडली. पालघर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली डॉ. होमी भाभा विद्यालय, तारापूर आणि यंग स्टार्स चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत 80 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवत बुद्धिबळाच्या डावपेचांची चुरस रंगवली. मुंबई, नवी मुंबईसह विविध शहरांतील खेळाडूंनी उपस्थित राहून स्पर्धेची रंगत वाढवली. अंडर-08, 10, 12, 14 तसेच खुल्या गटात सामने पार पडले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) मानांकन असलेल्या 10 पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरला.
विजेत्यांना ट्रॉफी व पदक देऊन सन्मानित करण्यात आले, तर सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस समारंभासाठी तारापूर अणुऊर्जा केंद्र 1 व 2 चे केंद्र निर्देशक विनयजी थत्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन जयवंत एच. राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी टूर्नामेंट डायरेक्टर दीपक अडे, पालघर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सहसचिव मकरंद कानिटकर, देवेंद्र चुरी यांची उपस्थिती होती. मुख्य पंच म्हणून गजानन सोनी यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना मनोज गोरे, आकाश पांचाळ, यश जाधव आणि सुदेश पांचाळ यांनी सहकार्य केले. डॉ. होमी भाभा विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक संजय भदाणे यांचेही आयोजनात मोलाचे योगदान लाभले.
प्रमुख पाहुणे विनयजी थत्ते यांनी बुद्धिबळ हा बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचा खेळ असल्याचे नमूद केले. तर दीपक अडे यांनी बोईसर परिसरात बुद्धिबळाचा प्रसार वाढवण्यासाठी अशा स्पर्धा व प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.
सुयोग्य नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली. खेळाडू, पालक आणि प्रेक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘चतुरंग उत्सव’ हा केवळ स्पर्धा नसून नवोदितांना व्यासपीठ देणारा आणि बुद्धिबळाची आवड वाढवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
