
पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली
वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून प्रशासनाने संबंधित गावांमध्ये अधिसूचना जाहीर केली आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ मधील कलम 3(G) अंतर्गत ही कारवाई राबविण्यात येत आहे.
पालघर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून जमिनींची मोजणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी मध्यस्थ व दलालांकडून मोबदल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जमीन संपादनासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त पैसे देण्याची गरज नसून सर्व मोबदला थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतीही व्यक्ती मोबदल्याच्या नावाखाली पैसे मागत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी भूसंपादन अधिकारी तेजस चव्हाण यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल आणि कोणत्याही गैरप्रकाराला स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.