मनोर येथे संतोष जनाठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ


पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर तालुक्यातील मस्तान नाका, मनोर येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संतोष जनाठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी (२५ सप्टेंबर) उत्साहात झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यालयाचा प्रारंभ करण्यात आला.
या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे तसेच जनसंपर्क वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपा प्रदेश विभागीय प्रसिद्धीप्रमुख समीर पाटील, भाजपा किसान मोर्चाचे पालघर जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, पालघर पूर्व मंडल अध्यक्ष हर्षद पाटील, भारत भक्ती आश्रमाचे स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, भाजपा पालघर जिल्ह्याचे माजी सरचिटणीस कमलेश मराठे, जिल्हा उपाध्यक्ष सुमती जैन, ज्येष्ठ नेते राजू पाटील, पालघरचे माजी नगरसेवक प्रथमेश पिंपळे, कुणाल संखे, अमित संखे, विनीत मोरे, शिरीष संखे तसेच मनोर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश गोंड यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यालय खुले राहणार असून, सेवा, संघटन, जनसंपर्क आणि जनहित या उद्देशाने आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *