वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा; “जनतेच्या हक्कांची आणि निसर्गाची किंमत मोजून विकास नको”

Writing
वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ठाम पाठिंबा
वरोर, डहाणू | 23 ऑगस्ट 2026 जनतेचा वाली
वाढवण बंदर आणि संबंधित प्रकल्पांविरोधात डहाणू तालुक्यातील वरोर येथे गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर, डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वैद्य तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेते नामदेव पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी चर्चा केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक मच्छीमार, आदिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांच्या उपजीविकेचा प्रश्न, जमीन व समुद्राशी संबंधित हक्क तसेच पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाचा मुद्दा काँग्रेसकडून राज्यस्तरावर मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हा विषय केवळ स्थानिक पातळीवर न ठेवता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवून स्थानिक जनतेच्या हितासाठी आवश्यक भूमिका घेण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, “विकासाला आमचा विरोध नाही; मात्र स्थानिक जनतेच्या हक्कांची, उपजीविकेची आणि निसर्गाची किंमत मोजून होणारा विकास आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार, आदिवासी समाज, शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. जमीन, समुद्र, पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्ष स्थानिक जनतेच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार असल्याचे कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी स्पष्ट केले.
“विकास हवा, पण जनतेच्या हक्कांची आणि निसर्गाची किंमत मोजून नाही,” असा स्पष्ट संदेश देत पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने वाढवण बंदरविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
— कॅप्टन सत्यम ठाकूर
अध्यक्ष, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *