दसरा संपून दिवाळी काही दिवसांवर आली असताना पालघर, डहाणू, वाणगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी फटाका विक्रीचे मोठमोठे स्टॉल उभे राहिले आहेत. मात्र हे स्टॉल नियमांनुसार सुरक्षित आहेत का, यावरून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रत्यक्ष पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पालघर | दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आणि आनंद आलाच. मात्र याच फटाक्यांच्या विक्रीसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्टॉलच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी नियम पाळून पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये विक्री सुरू असल्याचे दिसत असले, तरी इतर ठिकाणच्या स्टॉलमध्ये नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परवाना प्रक्रिया कशी असते
फटाका विक्रीसाठी परवाना देताना मंडळ अधिकाऱ्यांचा पंचनामा, तहसीलदारांचा अहवाल, पोलीस स्टेशन आणि प्रांत कार्यालयाच्या स्तरावर तपासणी व परवानगीची प्रक्रिया केली जाते. परवाना देताना विविध नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असते. तात्पुरते शेड अज्वलनशील साहित्यापासून, नियमानुसार सुरक्षित पद्धतीने तयार करणे अपेक्षित असते.
नागरिकांचे प्रश्न
- परवाने देण्यापूर्वी संबंधित यंत्रणांकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली जाते का?
- नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या स्टॉलवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करणार का?
- एखादी दुर्घटना घडल्यानंतरच शासकीय यंत्रणांना जाग येणार का?
- सर्व स्टॉलवर आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रणा, पाणी आणि वाळूने भरलेल्या बादल्या प्रत्यक्ष उपलब्ध आहेत का?
स्टॉलची प्रत्यक्ष पाहणी करून अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करावी आणि उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांची भूमिका
या विषयावर पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांची प्रतिक्रिया घेण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, फटाका विक्रीसाठी स्फोटक कायद्यानुसार आवश्यक परवाना उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयातून घेणे बंधनकारक आहे. पालघर तालुक्यासाठी आतापर्यंत सुमारे 114 अर्ज प्राप्त झाले असून, तहसीलदार आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अहवालाची पडताळणी करून योग्य प्रकरणांमध्येच परवानगी दिली जात आहे.
विक्रेत्यांनी पाळायचे नियम:
- फटाके विक्रीचे दुकान मोकळ्या जागेत लावावे आणि पत्र्याचे बंदिस्त शेड करावे
- दोन दुकानांमध्ये योग्य अंतर राखावे
- दुकानात किंवा आजूबाजूला गॅस सिलिंडर, गॅस पंप किंवा स्फोट होऊ शकेल अशा वस्तू ठेवू नयेत
- अग्निशामक यंत्र, पाणी आणि वाळू उपलब्ध ठेवावी
- कोणतीही घटना घडल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे
- स्फोटक कायदा 1884 आणि स्फोटक नियम 2008 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे
ग्राहकांनीही परवानाधारक विक्रेत्यांकडूनच फटाके खरेदी करावेत, तसेच किरकोळ विक्रेत्यांनीही परवानाधारकांकडूनच माल आणावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रदूषणाचाही मुद्दा
फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण हादेखील चिंतेचा विषय आहे. सण साजरा करताना आनंदाला सुरक्षिततेचे आणि पर्यावरणाचे गालबोट लागू नये, यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळीचा उत्साह कायम ठेवण्यासाठी सुरक्षितता आणि पर्यावरणाचे भान राखणे, ही प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी आहे.
