खासदार क्रीडा महोत्सवात ४७ हजार ७७३ खेळाडूंचा सहभाग!

Share:

ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा क्षेत्रातील हक्काचे व्यासपीठ; पालघरच्या क्रीडा महोत्सवाला ऐतिहासिक प्रतिसाद

पालघर : खासदार क्रीडा महोत्सवाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४७ हजार ७७३ खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग नोंदवत स्पर्धांना ऐतिहासिक यश मिळवून दिले. पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या ‘कै. विष्णू सवरा क्रीडा नगरी’मध्ये सलग चार दिवस हा क्रीडा सोहळा उत्साहात पार पडला.

गेल्या वर्षी ३५ हजारांहून अधिक खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. यंदा त्यामध्ये मोठी वाढ होऊन हा आकडा ४७ हजारांवर पोहोचला आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसह पुरुष व महिलांच्या खुल्या गटांसाठी कबड्डी, खो-खो, लंगडी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स) अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग खेळाडूंसाठी व्हीलचेअर स्पर्धा आणि मैदानी स्पर्धांचाही समावेश करण्यात आला होता.

स्पर्धांमध्ये १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील संघांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. सहभागी संघांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले होते. विशेष म्हणजे, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, विक्रमगड, वाडा, पालघर आणि वसई या सर्व तालुक्यांतील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रवासाची किंवा निवासाची कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या पुढाकारातून विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

खेळाडू, पालक आणि शिक्षकांसाठी सकाळचा अल्पोपहार, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण अशा संपूर्ण भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना कोणत्याही अडथळ्याविना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणार – खासदार डॉ. हेमंत सवरा

शालेय विद्यार्थ्यांना सातत्याने खेळण्याची संधी व हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. सागरी, नागरी आणि डोंगरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठे क्रीडाकौशल्य असून ते दाखवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. आगामी वर्षांतही हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, अशी ग्वाही खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी दिली.

या क्रीडा महोत्सवाला पालकमंत्री गणेश नाईक, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीवजी पाटील, आमदार संजय केळकर, आमदार योगेश सागर, आमदार राजेंद्र गावित, आमदार मनीषा चौधरी, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन व पर्यावरण मंत्री तसेच पालघरचे प्रभारी जिल्हाधिकारी मनोज रानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणारा हा क्रीडा महोत्सव पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असून, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *